संगमनेर : सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांची दूरदृष्टी, व्हिजन व सामाजिक कार्य या त्रिसूत्रीमुळेच संगमनेरचे नाव आज खऱ्या अर्थाने देश पातळीवर पोहचले, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे आदर्श सरपंच व पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणता राजा मैदानावर कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव खेमनर, महानंदा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, थोरात कारखान्याचे अध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, प्रशांत नाईकवाडी, सुभाष आहेर, सुरेश थोरात, अण्णासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, सध्या शेती व्यवसाय अडचणीत आहे. शेती व उद्योग व्यवसायातील आव्हाने वाढली आहेत. यासाठी कृषी प्रदर्शन हा शेतकऱ्यांना चांगला पर्याय ठरणार आहे. संगमनेर तालुक्यात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून मोठी पर्यावरण चळवळ उभी केली.
तालुका हिरवागार केला. येथे सहकारी संस्थांची निर्मिती करून तालुक्यात सहकारातून समृद्धी आणली. येथील संस्था महसूलमंत्री ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात प्रगतिपथावर आहेत.
कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आदर्शवत उपक्रम राबविले. त्यामुळे शेती क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक बदल झाले. गावाची प्रगती करायची असेल तर राजकीय पाठबळाबरोबरच प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे.