पुणतांबा येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्यांच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात पडून बापतरा येथील रहिवासी नवनाथ शंकर वाणी यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
काल सकाळी 10 वाजेच्या दरम्यान नवनाथ वाणी हे पुणतांबा येथील आपली कामे आटोपून मोटारसायकलवरून बंधार्याच्या पुलावरून बापतर्याकडे चालले होते. वसंत बंधार्याचा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डा वाचवितांना तोल जाऊन ते नदीत पडल्यामुळे त्यांचा खडकावर पडून मृत्यू झाला.
सध्या बंधार्यात दक्षिण बाजूला पुरेसे पाणी आहे मात्र उत्तर दिशेला नदीपात्र पूर्णतः कोरडे असून नदीपात्रातील खडक उघडे आहेत. त्यामुळे बंधार्यावरून नदीपात्रात पडलेला माणूस वाचण्याची शक्यता कमी असते.
त्यातच या बंधार्याचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटलेले आहे. तसेच कठड्यांना लावलेले सरंक्षक पाईपही चोरी गेलेले आहे. त्यामुळे बंधार्यावरून जा-ये करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
विशेष म्हणजे गोदावरी नदी काठच्या लाखगंगा, बापतरा, डोणगावसह अनेक गावांतील ग्रामस्थ विद्यार्थी यांना पुणतांब्याला येण्यासाठी या बंधार्यांच्या पुलाचा वापर करावा लागतो.
वारंवार मागणी करूनही पुलाला संरक्षक कठडे बसविण्याची व रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे लघू पाटबंधारे विभाग तसेच लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर शासनाला जाग येणार आहे, अशी संतप्त भावना ग्रामस्थाकडून व्यक्त केली जात आहे.