सोनई : पत्नीने पतीच्या मोबाइलमध्ये आलेले व्ही.डी.ओ. पाहिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरा येथील पतीसह तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे विवाहिता स्वाती शंकर दुर्गे (वय २२, रा. मोरेचिंचोरा, ता. नेवासा) हिने दिलेल्या जबाबावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
त्यात म्हटले आहे की, माझ्या पतीने माझ्या अंगावर पेट्रोल टाकून मला पेटवून दिले. पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबतचा व्ही.डी.ओ. मी पाहिला. त्या कारणावरून पती शंकर पाराजी दुर्गे यांनी मला पेटविले, तसेच आरोपी क्र. २ सासू चंद्रकला पाराजी दुर्गे व आरोपी क्र.३ एक महिला या तिघांनी संगनमत करून मला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी ही घटना घडली असून, माझ्या राहात्या घरीच मला मारहाण करून पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न माझ्या पतीने केला. पती शंकर दुर्गे याच्या मोबाइलमध्ये महिलेचे आलेले व्ही.डी.ओ. पाहिल्याच्या कारणावरून मला शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा प्रकार झाला असल्याचे स्वाती दुर्गे यांनी म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी याबाबत पीडितेची भेट घेतली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपी पसार असल्याने अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.