अहमदनगर : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या वकिलांनी जिल्हा रुग्णालयात येऊन खुलासा सादर केला. याबाबत बोलण्यास मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि वकिलांनी नकार दिला.
दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याप्रकरणी पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने नोटीस बजावली होती. मात्र, इंदुरीकरांनी मंगळवारपर्यंत खुलासा सादर केला नव्हता.
अखेर बुधवारी इंदुरीकरांचे वकील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पीसीपीएनडीटी समितीने बजावलेल्या नोटिसीला या वकिलांनी लेखी उत्तर दिले.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो असे लेखी पत्र काढले होते. पीसीपीएनडीटी समितीने बजावलेल्या नोटिसीचा खुलासा करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता .