अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात देशाच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचा निषेधार्ह प्रकार नवीन महाराष्ट्र सदनात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या गोरखा रेजिमेंटच्या जवानांना व्हीआयपी नसल्याचे सांगून सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जेवणाच्या भर ताटावरून उठवल्याचे समोर आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी मानवंदना देण्यासाठी गोरखा रेजिमेंटने आपला बँड पाठवला होता. बँडचे जवान सकाळी सातपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत नवीन महाराष्ट्र सदनात मानवंदना देत होते. कार्यक्रमानंतर सगळे जवान चहा-नाश्ता घेण्यासाठी सदनातील व्हीआयपी कँटीनमध्ये बसले.
सगळ्यांनी प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि टेबलवर खायला बसले. एवढ्यातच सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर आले आणि ‘ही कँटीन फक्तव्हीआयपी लोकांसाठी असून तुम्ही व्हीआयपी नाहीत. लगेच कँटीनमधून बाहेर निघा,’ अशा भाषेत जवानांना जेवणाच्या ताटावरून उठण्यास भाग पाडले.
महत्त्वाचे म्हणजे देशाच्या रक्षणासाठी जीवाचे बलिदान देण्यास तत्पर असलेल्या जवानांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचा प्रकार मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळात घडला, ही बाब खेदजनक आहे, अशी खंत संभाजी राजे यांनी व्यक्त केली.
संभाजी राजे यांनी पुढे सांगितले की, गोरखा रेजिमेंटचे जवान जाणीवपूर्वक व्हीआयपी कँटीनमध्ये गेले नाहीत. सामान्य लोकांसाठी असलेली कँटीन बुधवारी बंद होती आणि व्हीआयपी कँटीन सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे जवानांना व्हीआयपी कँटीनमध्ये जेवणासाठी बसण्यास सांगण्यात आले होते. मात्र विजय कायरकर यांनी त्यांना तोंडचा घास खाली ठेवायला लावून उठवले, ही बाब खूप खेदजनक आणि निषेधार्ह आहे.
मुळात लष्कराच्या नवीन नियमानुसार, आर्मीच्या बँडला खासगी कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. परंतु आजचा कार्यक्रम शिवाजी महाराजांचा असल्यामुळे गोरखा रेजिमेंटने आपला बँड पाठवला होता. ते स्वखर्चाने आले होते. एकही पैसा ते घेत नाहीत. हे सगळे त्यांनी महाराजांवरच्या प्रेमापोटी आणि आदरापोटी केले. यानंतरही महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अशाप्रकारची वागणूक द्यावी हे खूप दुर्दैवी असल्याचे संभाजी राजे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, निवासी आयुक्त समीर सहाय यांनी या कार्यक्रमासाठी खूप मदत केली. हॉलसह अन्य सोयीसुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्यात. फक्त विजय कायरकर यांच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत, असेही राजे म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com