Ahmednagar Politics : राज्यात सत्तांतर होऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्री पद मिळाले. तेव्हापासून त्यांनी आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले आहे.
त्यांच्या काळातील कामांच्या चौकशीचे इशारे तर कधी संगमनेरमध्ये जाऊन कार्यक्रम घेतले जात होते. अखेर थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांना उत्तर दिले आहे. ‘आपल्याला पद मिळाले त्याप्रमाणे वागा.

पदाची किंमत तरी ठेवा. ‘सौ शहरी एक संगमनेरी’ असा आमचा तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही,’ अशा शब्दांत थोरात यांनी सुनावले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका कार्यक्रमात थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘आम्ही कधीही वाईट राजकारण केले नाही. कुणाच्या अन्नात माती कालवली नाही किंवा कुणाबद्दल वाईटही चिंतले नाही. मात्र सध्याचे सुरू असले द्वेष भावनेचे राजकारण लोक पाहत आहेत, हे विसरू नका.
आपल्याला पद मिळाले त्याप्रमाणे वागा. पदाची किंमत तरी ठेवा. आपल्या तालुक्यात काही खबरे निर्माण झाले आहेत. या खाबऱ्यांचा आता जनता नक्की बंदोबस्त करेल. संगमनेर तालुका दबावाला बळी पडणार नाही.
संघर्ष हा संगमनेरकरांच्या नसानसांत भिनलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यासह पाण्यासाठी मोठा संघर्ष आम्ही केला आहे. दबावाचे व खोट्या केसेस दाखल करण्याचे राजकारण संगमनेरकर कधीही खपवून घेणार नाहीत.
सौ शहरी एक संगमनेरी असा हा तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही,’ असेही थोरात म्हणाले. संगमनेरमध्ये आम्ही केलेल्या रस्त्यांच्या कामाचे उदघाटन करण्यापेक्षा खड्डयांमुळे राज्यभर बदनाम झालेल्या नगर-शिर्डी महामार्गाचे काम करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे,’ अशी टीकाही थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता केली.