पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १८० किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारणी करण्यात येणार आहे.
पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. त्यातून या तीन जिल्ह्यांत या कॉरिडॉरच्या अनुषंगाने औद्योगिक विकास साधता येईल का याचीही पडताळणी केली जाणार आहे.
२० हजार कोटी रुपयांचा खर्च
पुणे-नाशिक अंतर दोन तासांत पार करणे शक्य होणार आहे. यासाठी ‘एमएसआरडीसी’ २० हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या प्रकल्पाची सुसाध्यता तपासणे आणि प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याकरीता सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ‘एमएसआरडीसी’ने निविदा काढल्या आहेत.
सुरतचा प्रवासही वेगवान
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या सुरत ते चेन्नई महामार्गाला या औद्योगिक महामार्गाची जोडणी दिली जाणार असल्याने सुरतचा प्रवासही वेगवान होणार आहे. या महामार्गाच्या उभारणीनंतर पुणे, नाशिक आणि मुंबई हा औद्योगिक त्रिकोण अधिक जवळ येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
तीन जिल्ह्यांना जोडणार
‘हा महामार्ग पुणे, नाशिक, नगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. यातून या भागातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल. या महामार्गाचा सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या वर्षभरात प्राप्त होईल,’ अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
समांतर औद्योगिक द्रुतगती महामार्ग
रेल्वेकडून पुणे ते नाशिकदरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. याच मार्गाला समांतर औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे.
पुणे आणि नाशिक दरम्यानची वाहतूक वेगवान
दोन्ही बाजूच्या वाहतूकीसाठी प्रत्येकी तीन लेनचा हा महामार्ग असणार आहे. पुणे रिंग रोड येथून या मार्गाची सुरुवात होऊन नाशिक येथे सुरत ते चेन्नई दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला तो जोडण्याचे नियोजन आहे. हा महामार्ग पूर्णपणे प्रवेश नियंत्रित असेल. त्यातून पुणे आणि नाशिक दरम्यानची वाहतूक वेगवान होईल.
वेळ दोन तासांवर येणार !
सद्यस्थितीत पुणे ते नाशिक प्रवासासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या उभारणीनंतर हा वेळ दोन तासांवर येणार आहे; तसेच या भागातील ऑटोमोबाइल इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री आणि कृषी उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल, असा प्रयत्न ‘एमएसआरडीसी’कडून केला जात आहे.