Ahmednagar Politics : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा प्रवास आता यशस्वी दिशेने सुरु झाला आहे. चांगले वाईट दिवस आणि प्रदिर्घ संघर्ष करुन, सहकार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी इतर कारखान्यांनाही सहकार्य केले, परंतू आता डॉ.विखे पाटील कारखाना स्वतंत्र झाला असल्याने प्रवरा कुटूंबातील सभासदांच्या
उत्कर्षासाठीच यापुढे वाटचाल असेल असा विश्वास व्यक्त करतानाच भावाच्या स्पर्धेत आपला कारखाना इतरांच्या पुढे असेल आशी ग्वाही खासदार.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या गळीत हंगामाची सुरूवात खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. माजी चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,
गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, चेअरमन गिताताई थेटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक आधिकारी, कामगार याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा.डॉ.विखे म्हणाले की, विखे पाटील कारखाना आता स्वतंत्र झाला आहे. राहुरी कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेने घेतला आणि गणेश कारखान्याचा करार संपला असला तरी त्यांचे सभासद न्यायालयात गेले असल्याने सभासदांनी मागणी केल्याशिवाय तेथील कराराबाबत आज बोलणे उचित होणार नाही,
कारण न्यायालयीन प्रक्रीया सुरु असल्याकडे लक्ष वेधत आता फक्त आपलाच कारखाना केंद्रस्थानी ठेवून ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ह्यामुळेच विखे पाटील राज्यात मोठ्या मंत्रीपदावर पोहचले !
आपल्या कारखान्याने संघर्षाचा काळ पाहीला, वाईट दिवसही अनुभवले परंतू यातून चांगले दिवस आता आपण पाहात असल्याचे सांगतानाच या सर्व संघर्षात सभासद, शेतकरी, कामागार यांनी मोलाची साथ दिली.
आपल्या सर्वांच्या पाठबळानेच नामदार विखे पाटील राज्यात मोठ्या मंत्रीपदावर पोहचले. याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत डॉ.विखे पाटील कारखाना सर्वाच्या पुढे असेल याची ग्वाही त्यांनी दिली.
गाळप पूर्ण होईल असा विश्वास
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन करून सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत मोठे निर्णय घेत आहेत. सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळ सक्षम होत असल्याचे नमूद करून डॉ.विखे यांनी सांगितले की, यंदा प्रथमच कारखान्याचे व्यवस्थापन, कामगार आणि यंत्रणा सज्ज आहे परंतू शेत तयार नाही.
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने ऊस तोडणी कशी सुरू करायची याचे आव्हान असल्याचे सांगतानाच जेवढा कालावधी मिळेल त्यामध्ये गाळप पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा.चेअरमन विश्वासराव कडू पाटील यांनी केले.