श्रीगोंद्यात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत विनयभंग

Published on -

श्रीगोंदे :- तालुक्यातील टाकळी लोणार गावातील १५-१६ गावगुंडांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ व अरेआवी करत तमाशातील पुरुष व महिला कलावंतांशी असभ्य वर्तन व झटापट केली.

लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ एप्रिलला टाकळी लोणार येथील म्हसोबा यात्रेनिमित्त हरिभाऊ बढे नगरकरसह शिवकन्या बढे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दुपारी ४ च्या सुमारास गावात तमाशाचे स्टेज उभारण्याचे काम चालू असताना गावातील संदीप सुरेश सुडगे, अशोक माउली सुडगे, अनिकेत पावलस सुडगे, संजय सुडगे, शांताराम सुडगे, गणेश कैलास जगदाळे, सचिन सुरेश सुडगे, नितीन मल्हारी जगदाळे व इतर ५ ते ७ जण गावगुंड मद्य प्राशन करून आले.

त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. तमाशाचालकाने ही बाब यात्रा कमिटीच्या कानावर घालत त्यांना तिथून पाठवून दिले. रात्री पुन्हा हेच तरुण तमाशाच्या ठिकाणी जमले.

दारूच्या नशेत शिवीगाळ करत लोखंडी गज, लाकडी दांडक्याने त्यांनी कलावंतांना बेदम मारहाण केली. महिलांच्या अंगाशी लगट करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्यातील एका १६ वर्षीय मुलीला गुंडांनी बाजूच्या शेतात उचलून नेले. लोकांचा जमाव त्यांच्यामागे पळाल्यामुळे त्यांनी मुलीला सोडून देत तेथून पळ काढला.

या मारहाणीत एका महिला कलावंताचा हात फ्रॅक्चर झाला. इतर कलावंतांनादेखील बेदम मारहाण झाली. सुमारे ११-१२ महिला व पुरुष कलावंत जखमी झाले आहेत.

याबाबत श्रीगोंदे पोलिसात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर तमाशाच्या संचालिका शिवकन्या नंदा कचरे (३७, कोरडगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News