अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली: देशासह राज्यातील विविध भागांत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकार या महिन्याच्या २० तारखेपर्यंत १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करू शकते, याविषयीची शक्यता वर्तवली जात होती.
परंतु सरकार आता लॉकडाऊनच्याच दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. देशाच्या विविध भागांत २०१९ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याची नुकसानभरपाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती.
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत १० हजार कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी काही दिवसांपूर्वी ४ हजार ५०० कोटी रुपये देण्यात आले होते. कृषी विभागानुसार महाराष्ट्राला ८०० कोटी किंवा १००० कोटी रुपये दिले जातील.
यासह मध्यप्रदेशासाठी २ हजार ५०० ते ३ हजार कोटी रुपये, कर्नाटकसाठी १ हजार ५०० कोटी रुपये, राजस्थानसाठी १ हजार २०० कोटी आणि आंध्रप्रदेशसाठी ८०० ते १००० कोटी रुपये दिले जातील. दरम्यान, विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी, असा दबाब सरकारकडून विमा कंपन्यांवर टाकला जात आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रब्बीच्या पिकांची काढणीही शेतकरी करू शकत नाहीत. यामुळे सरकार लवकरच पिकांच्या नुकसानीचा पैसा देण्याच्या विचाराधीन आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीक विम्याचा अहवाल अंतिम स्थितीत आला असून लवकरच विम्याचा पैसा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com