अहमदनगर :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या ऑनर किलींग प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली.
या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. हा ऑनर किलींगचा प्रकार नसून मंगेशनेच रुक्मिणीला पेटवले असावे, या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत.
स्थानिक नागरिकांनुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश व रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहाला दोघांच्याही कुटुंबांचा विरोध नव्हता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली.
किरकोळ कारणांवरून तो तिला बेदम मारहाण करत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुक्मिणीला बेदम मारहाण केली. मारहाणीला कंटाळून रुक्मिणी गावातीलच आपल्या माहेरी निघून गेली.
मंगेश कधीही येऊन मुलीला मारहाण करेल, या भितीने रुक्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुक्मिणी व तिच्या लहान भावंडांना घरात ठेवून दाराला बाहेरुन कुलूप लावत असे.
घटना घडली त्या दिवशीही घरात रुक्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (६), करिश्मा (५), विवेक (३) होते. आई घराला बाहेरुन कुलूप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडीलही सकाळीच मजुरीसाठी बाहेर पडले होते.
रुख्मिणी रहात असलेले घर जुन्या बांधणीचे, लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे. 1 मे रोजी मंगेशने घराच्या मागच्या बाजूने, पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला. मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते.
सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रुख्मिणीच्या अंगावर ओतले व तीला पेटवले. रुख्मिणीने पेट घेतल्यावर तीने मंगेशला मिठी मारली.
आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रुख्मिणी स्वत: घराबाहेर आली.पाठोपाठ मंगेशही आला.
रुग्णवाहिकेतून रुक्मिणीला व मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात व नंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुण्यात उपचारांदरम्यान रुक्मिणीचा मत्यू झाला. पोलिसांनी मंगेशच्या फिर्याद नुसार ऑनर किलींगचा गुन्हा दाखल केला.
- केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या
- दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले
- झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी
- खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…
- कुंभमेळ्याला जाण्यासाठी नगरकरांसाठी दोन रेल्वे