Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीनची खेडा खरेदी जोरावर सुरू आहे. खेडा खरेदीमध्ये बियाणे कंपन्या खरेदी करत असल्याने सोयाबीनच्या दरात खेडा खरेदीमध्ये वाढ झाली आहे.
परिणामी बाजार समिती मधली आवक कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात देखील सोयाबीनची खेडा खरेदी जोमात सुरू आहे. खेडा खरेदी मध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते खेडा खरेदी त्यांना बाजारसमितीच्या समतोल दर मिळत आहे.

अशा परिस्थितीत बाजार समितीत घेऊन जाण्यासाठी वाहन खर्च, तोलाई, हमाली, अडतं देण्यापेक्षा जागेवर सोयाबीन विक्री करून तेवढाच दर घेणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. शेतकरी बांधव यामुळे जागेवर सोयाबीनची विक्री करत असून याचा त्यांना फायदा होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया व खाद्य तेलावर असलेले स्टॉक लिमिट काढून घेतल आहे.
त्यामुळे सोयाबीन दरात वाढ होत आहे. खरं पाहता जाणकारांनी यामुळे सोयाबीन दरात मोठी वाढ होणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र तूर्तास तरी यामुळे सोयाबीन दरात फारसे वाढ झालेली नसल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून दिला असून बाजारात यापेक्षा अधिक दर सोयाबीनला मिळत आहे.
बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळत आहे. विशेष म्हणजे खेडा खरेदीत देखील बियाणे कंपन्यांकडून तसेच दलालांकडून एवढाच भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव बाजारात जाऊन विक्री करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा यांचा विचार करता जागेवरच सोयाबीन विकून मोकळे होत आहेत.
यामुळे बाजारपेठा विरान पडल्या आहेत. जाणकार लोकांनी खेडा खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बाजारात सोयाबीनची आवक होत नसल्याचे सांगितले आहे. मात्र असे असले तरी खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. अनेक भोंदू व्यापारी लोक भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांकडून जागेवर खरेदी करतात आणि त्यांचे पैसे बुडवतात. अशा अनेक घटना राज्यात वारंवार समोर आल्या आहेत.
खेडा खरेदीमध्ये काटामारी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. विशेषतः कापसाच्या बाबत हा प्रकार अधिक पाहायला मिळतो कारण की कापसाची मोजणी ही त्यांच्या काट्यावर केली जाते. एकंदरीत जागेवर विक्री करताना शेतकरी बांधवांनी रोख व्यवहार करणे आणि आपला शेतमाल मोजणीच्या बाबतीत सतर्क राहणे देखील महत्त्वाचे ठरते.
बाजार समितीमध्ये बाजार समिती प्रशासनाचे नियंत्रण व्यापाऱ्यांवर असते त्यामुळे शेतकऱ्यांची लूट किंवा पिळवणूक होण्यास लगाम लावला जातो. यामुळे शेतकरी बांधवांनी बाजार समितीमध्येच आपला शेतमाल विकण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.