Panjabrao Dakh : शेतकऱ्यांमागचं शुक्लकाष्ठ काही संपण्याच नाव घेत नसल्याच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. सध्या कापूस समवेत सोयाबीन आणि कांद्याला बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
यातच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमागे शनीची साडेसाती सुरू आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरं पाहता या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे.
यावर्षी पावसाळी काळात सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस लांबला त्यानंतर जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. या अतिवृष्टी मधून शेतकरी बांधवांनी कसेबसे आपली पिके वाचवली मात्र पुन्हा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांचा तोंडी आलेला घास हिरावून घेतला.
दरम्यान आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून रब्बी हंगामात पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ मानले जात आहे. खरं पाहता आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीरपरिचित व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांनी उद्या आणि परवा पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार उद्या आणि परवा अर्थात 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, मंगसूरी आणि कर्नाटक भागात पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सज्ज झालेल्या शेतकरी बांधवांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तसेच राज्यातील बहुतांशी भागात अजून कापूस पीक वावरात उभे असल्याचे चित्र आहे, अशा परिस्थितीत कापसाला देखील या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. निश्चितच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून यामुळे भर पडणार आहे.