Maharashtra Breaking : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी लंपी या महाभयंकर आजाराचा पशुधनावर हल्ला झाला. सुरुवातीला राजस्थानमध्ये या महाभयंकर आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन संकटात सापडले होते.
महाराष्ट्रात देखील या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांची धडधड वाढली होती. महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पशुधन विशेषता गोवंश या आजाराच्या विळख्यात आले. मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत होते.
यामुळे संबंधित पशुपालकांना मोठी आर्थिक हानी होत होती. अशा परिस्थितीत वर्तमान शिंदे सरकारने पशुपालकांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाईची घोषणा केली.
महाराष्ट्रातील ज्या पशुपालक शेतकऱ्यांचे या आजारामुळे पशुधन मृत्युमुखी पडले आहे त्यांना 18 कोटी 49 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास 7274 पशुपालक शेतकऱ्यांना 18 कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
दरम्यान या आजाराची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. 21 नोव्हेंबर अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 666 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला आहे. 2082,595 एवढं पशुधन या आजाराने बाधित होतं यापैकी जवळपास दोन लाख पाच हजार पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
आणि बाधित पशुधनापैकी 19 हजार 77 पशुधन मृत्युमुखी पडले आहे. ज्या पशुपालक शेतकऱ्यांचे पशुधन मृत्युमुखी पडले आहे अशा पशुपालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून अनुदान देखील वितरित केले जात आहे. त्यामुळे पशुपालकांना तूर्तास दिलासा मिळत आहे.
राज्य शासनाकडून या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू असून पशुधनाचे लसीकरण वेगाने केले जात आहे. दरम्यान आता ऊसतोड सुरू झाली असल्याने ऊस वाहतुकीसाठी पशुधन एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहे. अशा परिस्थितीत आजाराचा धोका वाढला आहे यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यात आली आहे.