Nashik News : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधव ही बाब आता ओळखून चुकले असून शेतीमध्ये आता आधुनिक प्रयोगाचा अवलंब करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत बाहेरून हिरवे आणि आतून पिवळे असणारे कलिंगड उत्पादित केले आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे. तालुक्यातील मौजे दाभाडी येथील महेंद्र निकम यांनी या अनोख्या कलिंगडची शेती सुरू केली आहे. खरं पाहता निकम कायमच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. याच प्रयोगातून त्यांनी ऑगस्टमध्ये तसेच सप्टेंबर मध्ये आपल्या एक एकर क्षेत्रात आतून पिवळ्या आणि लाल रंगाचे सिडलेस कलिंगड उत्पादित करण्याचे किमया साधली आहे.
खरं पाहता मालेगाव तालुक्यातील दाभाडी, सातमाने, रावळगाव, कोठरे या परिसरातील शेतकरी बांधवांचा मदार हा डाळिंब या फळबाग लागवडीकडे असतो. तसेच या परिसरात कांदा या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र निकम यांनी यापेक्षा अलग आणि जरा हटके प्रयोग केला असून पिवळा गर असलेले आणि लाल गर असलेले सीडलेस कलिंगड पिकवले आहे.
हे कलिंगड पिक अवघ्या दोन महिन्यात काढण्यासाठी तयार होते. त्यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत दोन हजार रुपये पिवळ्या कलिंगडचे आणि दोन हजार रुपये सिडलेस कलिंगडचे लावले आहेत. विशेष म्हणजे निकम यांनी पालकमंत्री तसेच माजी कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना त्यांच्या या प्रयोगाबद्दल माहिती दिली आहे. भुसे यांनी निकम यांच्या प्रयोगाचे कौतुक केले आहे.
निकम यांनी केवळ पिवळ्या कलिंगडचा प्रयोग केला असे नाही तर गेल्या वर्षी आपल्या 30 गुंठे शेतजमिनीत त्यांनी रंगीबेरंगी फुलावर देखील उत्पादित केले होते. पिवळ्या आणि जांभळ्या फ्लॉवरची लागवड त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर केली तरी देखील त्यांना चांगली कमाई झाली होती.
निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात त्यांनी कलिंगडची लागवड केली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे यातून केवळ सहा टन उत्पादन मिळाले. 45 रुपये प्रति किलो या दराने त्या कलिंगडची विक्री झाली. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एक एकर क्षेत्रात कलिंगडची लागवड करण्यात आली असून यातून त्यांना चांगली कमाई होण्याची अशी आहे.