Soybean Market Update : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली होती. केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांवर असलेले निर्बंध शिथिल केले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढल्यानंतर तेलबियांचे दर वधारतील असा जाणकारांचा अंदाज होता.
प्रामुख्याने सोयाबीन दराला याचा आधार मिळेल असं भाकित जाणकारांकडून वर्तवलं जात होतं. जाणकारांचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यात खरा ठरला. सोयाबीन दर वधारले राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये सोयाबीनच्या कमाल बाजारभावाने साडेसहा हजार रुपयांचा पल्ला गाठला तर सरासरी दर 6000 रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपले होते.
यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकत होते. परंतु सध्या स्थितीला सोयाबीन दरात मोठी घसरण झाली असून बाजार भाव 5000 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास पाहायला मिळत आहेत. दरम्यान जागतिक बाजारपेठेत सोयाबीन दरवाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याने येत्या काही महिन्यात सोयाबीन दरात वाढ होणार आहे. कृषी तज्ञांनी येत्या तीन ते चार महिन्यात सोयाबीन दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सोयाबीन उत्पादकांना देखील बाजारभावात वाढ होण्याची आशा असल्याने त्यांनी सोयाबीन विक्री ऐवजी साठवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. खरं पाहता सध्या स्थितीला पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचे आसपास दर मिळत असल्याने या बाजारभावात सोयाबीन विक्री करणे शेतकऱ्यांसाठी परवडत नाहीये. याशिवाय यंदा हवामान बदलामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली असून ज्या शेतकरी बांधवांच्या सुपीक आणि दांडग्या जमिनी होत्या त्या ठिकाणी चांगले उत्पादन मिळाले आहे.
मात्र हलक्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनचे नगण्य उत्पादन मिळणार आहे. एकीकडे उत्पादनात आलेली कमी आणि दुसरीकडे बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कमालीचे डगमगले आहे. यामुळे सोयाबीन विक्रीऐवजी शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर आहे. खरं पाहता गेल्या मार्च एप्रिलमध्ये सोयाबीन साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता. अशा परिस्थितीत यंदा देखील सोयाबीनला चांगले दिवस येतील आणि दरात मोठी वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या महिन्यात सोयाबीन दारात सातशे रुपयांपर्यंतची वाढ झाली. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दरात मोठी घसरण झाली असून सोयाबीन दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपले आहेत. पण येत्या 3-4 महिन्यात सोयाबीनच्या दरात वाढ होणार आहे. दरवाढ होईल मात्र किती दर वाढतील याबाबत स्पष्टपणे व्यापाऱ्यांनी सांगितले नाही. निश्चितच शेतकरी बांधवांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील संकटाचा सामना करावा लागत आहे.
एकंदरीत अजून तीन ते चार महिन्यात सोयाबीन दरात वाढ होण्याचा अंदाज असल्याने तोवर संसाराचा गाडा कसा हाकायचा, पैशांची उभारणी कशी करायची, रब्बी हंगामासाठी आवश्यक खतांसाठी पैसे कसे जमवायचे? यांसारखे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभे झाले आहेत. यामुळे बापरे बाप आणि डोक्याला ताप असा उद्गार शेतकऱ्यांच्या तोंडून निघत आहे.