Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांची धडकी भरवणारा एक हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरं पाहता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांमागे साडेसाती सुरू आहे. सुरुवातीला पावसाचे उशिरा आगमन झालं, त्यानंतर असा पाऊस आला की पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यातून कसं-बस आपलं पीक वाचवलं आणि शेवटी परतीच्या पावसाने होतं नव्हतं ते सर्व हिरावून घेतलं.

आता खरीप हंगाम हातचा गेला म्हणून रडत-कुडत बसण्यापेक्षा बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे एक मोठ्या आशेने पाहू लागला. खरिपात झालेल्या नुकसानीचीं भरपाई का होईना रब्बीतून भरून काढू अशी शेतकऱ्याचीं आशा होती. मात्र रब्बी हंगामात देखील नियती शेतकऱ्यांचे वाटोळं करण्यास ठाम उभी आहे. त्यामुळे आता ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे.
नियतीचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे. आधीच खरीप हंगामात बहु कष्टाने आणि निसर्गाशी दोन हात करून पिकवलेला शेतमाल बाजारात कवडीमोल दरात विकला जात असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे आणि आता पुणे वेधशाळेने 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली असल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे.
खरं पाहता गेल्या आठवड्यापासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी होती. आता राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
याच चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यन्त काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषता कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव अधिक असून सिंधुदुर्ग रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
उर्वरित महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे मात्र कमी प्रमाणात. 11 ते 14 डिसेंबर या काळात पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने नमूद केले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना सजग राहण्याची यावेळी आवश्यकता आहे.













