संगमनेर : राष्ट्रीय आपत्ती असो वा धार्मिक, सामाजिक कार्य असो प्रत्येकवेळी आपल्या दातृत्त्वाचा परिचय देणाऱ्या संगमनेरच्या मालपाणी परिवाराने ‘कोरोना’शी लढणाऱ्या शासन व प्रशासनाला भरीव अर्थसहाय्य केले आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी ‘संगमनेर सहाय्यता निधीला’ पाच लाखांचा धनादेश दिला.
आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मालपाणी परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये याप्रमाणे एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उद्योगसमूहाचे संचालक राजेश व मनिष मालपाणी यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सुपूर्द केला.
यासोबतच जनकल्याण समितीला अकरा लाख, ग्रामीण रुग्णालयांतील सुविधांसाठी पाच लाख, संगमनेरच्या कुटीर रुग्णालयाला एक लाख, लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या कोरोनाग्रस्त भोजन सेवेसाठी दोन लाख व शहरातील औषध फवारणीसाठी एक लाख असा एकूण सव्वाकोटीचा निधी देवून मालपाणी परिवाराने आपली समाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांनी मालपाणी परिवारावर सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपण्याचे संस्कार केले आहेत. त्या संस्काराशी पायिक राहून मालपाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयात रुग्ण तपासणी सेवा कोरानाच्या संकटातही चोवीस तास उपलब्ध आहे. चार ऑपरेशन थिएटर असलेल्या या रुग्णालयात अत्यल्प दरात सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. आजपर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®