Nashik Successful Farmer : महाराष्ट्रात कांद्याचे शेती विशेष उल्लेखनीय आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा म्हटला म्हणजे कांदा उत्पादनासाठी अव्वल. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थातच कसमादेपट्टा तर कांदा उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो.
कसमादे पट्ट्यात उत्पादित होणारा कांदा हा संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारात दाखल होत असतो. दरम्यान या कसमादे पट्ट्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक भन्नाट प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथील एका मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या नवयुवक तरुणाने आपल्या मेकॅनिकल क्षेत्रामधील मेकॅनिझम शेतीमध्ये उपयोग हात आणला आहे.
या नवयुवक उच्चशिक्षित तरुणाने आपल्या ज्ञानाचा योग्य तो वापर करत शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली आहे. चिंचावड येथील तुषार एकनाथ अहिरे या मेकॅनिकल इंजिनियर नवयुवकाने वडिलांचे छत्र हरपल्यानंतर शेती व्यवसायाची सर्वस्वी जबाबदारी घेतली. आपल्या परिवाराचा सर्व भार आपल्या खांद्यावर उचलला. त्यांचे वडील देखील आधुनिक पद्धतीने शेती करत असत आणि तुषारने देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आधुनिकतेची जोड धरत शेती करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर देखील त्यांनी शेतीला निवडल आहे. त्यांनी आपल्या बारा गुंठे शेत जमिनीवर मल्चिंग पेपरच्या सहाय्याने कांदा लावला आहे. तुषार यांच्या मते 12 गुंठे शेत जमिनीत जवळपास 75 हजार रोपांची लागवड झाली आहे. तुषार यांच्या मते पारंपरीक पद्धतीने कांदा लागवड केली तर दोन एकरात जेवढे उत्पादन मिळेल तेवढं या पद्धतीने शेती केल्यास एका एकरात उत्पादन मिळू शकत. मल्चिंग पेपरच्या सहाय्याने कांदा लागवड केल्यास पाण्याची बचत होते.
विद्राव्य खतांची बचत होते, तसेच खत व्यवस्थितरित्या पिकाला देता येतो आणि यामुळे कांदा चांगला पोसला जातो. अशा पद्धतीने कांदा लागवड केल्यास तन नियंत्रणाचा ताण राहत नाही. परिणामी तणनाशकाची फवारणी करावी लागत नाही यामुळे खर्च तर वाचतोच शिवाय पिकाचा दर्जा देखील चांगला राहतो.
निश्चितच या पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात. यातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याचा दावा तुषार यांनी केला आहे. त्यांना आपल्या बारा गुंठे शेत जमिनीतून तब्बल 75 क्विंटल एवढे उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास असल्याने निश्चितच त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.