Farmer Success Story : अलीकडे देशात शेतकरी पुत्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचा ओरड करत असून शेतीकडे पाठ फिरवत आहेत. शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगाला तरुण शेतकरी पुत्रांची पसंती पाहायला मिळत आहे. शेतीमध्ये चांगली कमाई होत नाही म्हणतं नोकरी किंवा उद्योगाला प्राधान्य दिल जात आहे.
मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी बांधव आहेत जे पूर्णपणे अशिक्षित असूनही एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरदाराप्रमाणे लाखोंची कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही मात्र तरीही त्यांनी आपल्या शेती कसण्याच्या कसबेतून आणि आपल्या कष्टातुन लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.

आदिवासी बहुलजिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या मौजे डाब येथील रहिवासी शेतकरी धीरसिंग फुसा पाडवी या अशिक्षित शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीतून एकरी सहा लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवले आहे. निश्चितच चांगल्या शिक्षित प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील लाजवेल अशी कामगिरी या अशिक्षित शेतकऱ्याने करून दाखवली आहे. खरं पाहता धीरसिंग 2007 पासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत.
मात्र सुरुवातीला स्ट्रॉबेरी शेतीमधील कोणतेच बारकावे त्यांना माहिती नसल्याने त्यांना या शेतीतून मोठं नुकसान सहन करावं लागलं. नुकसान झाले तरीदेखील धीरसिंग खचले नाहीत त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी यशासाठी धीर धरला. अखेर कृषी विभागाचा सल्ला घेण्याचा त्यांनी ठरवलं.
कृषी विभागाच्या सल्ल्याने स्ट्रॉबेरी शेतीत मोठा बदल करण्यात आला. माती परीक्षण करून स्ट्रॉबेरी पिकासाठी आवश्यक त्या खतांचा संतुलित प्रमाणात डोस देण्यात आला. शिवाय महाबळेश्वरला एका प्रशिक्षणासाठी त्यांना नेण्यात आले होते. या प्रशिक्षणात त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती कशी केली जाते या बाबींची माहिती त्यांना झाली.
यानंतर त्यांनी 2021 साली 12,000 स्ट्रॉबेरी रोपे आपल्या शेतात लावली. ज्यातून त्यांना तीन टन एवढे उत्पादन मिळाले. यासाठी एक लाख 55 हजाराचा खर्च आला आणि साडेचार लाख रुपये नफा मिळाला. या वर्षी देखील तेवढीच स्ट्रॉबेरी रोपे लावण्यात आली आहेत आणि यातून त्यांना सहा टन उत्पादन मिळणार असून सहा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
यासाठी दीड लाखाचा खर्च त्यांना आला आहे. निश्चितच यावर्षी त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या आणि नियोजनाच्या जोरावर शेतीमध्ये केलेली ही कामगिरी चांगल्या शिक्षित शेतकऱ्यांना विचारात पाडणारी आहे.













