कुआलालंपूर : इंस्टाग्राम ॲपवरील ६९ टक्के फॉलोवर्सनी मरण्याचा सल्ला दिल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मलेशियात मंगळवारी घडली.
मृत्यू की जीवन? असा विचित्र प्रश्न या मुलीने इंस्टाग्रामवरील फॉलोवर्सना विचारला होता. या सर्वेतील कौल गांभीर्याने घेत मुलीने थेट एका दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत मृत्यूला कवटाळले.
मलेशियातील सरवाक राज्यात बोर्नियो बेटावरील कुचिंग शहरात मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास किशोरवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
मृत्यूच्या काही तासांपूर्वीच या मुलीने आपल्या इंस्ट्राग्राम या फोटो शेअरिंग ॲपवर आपल्या फॉलोवर्सना मरण्याविषयी मते मागविली होती.
दुदैवी बाब म्हणजे या सर्वेला शेकडो फॉलोवर्सनी प्रतिसादही दिला. त्यातील जवळपास ६९ टक्के फॉलोवर्सनी तिला मरण्याचा सल्ला दिला.
सोशल मीडिया ॲपवरील या सर्वेतील कौल गांभीर्याने घेत मुलीने प्रत्यक्षातही आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांच्या आताच तिने एका दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत स्वत:ला संपविले.
नैराश्याने ग्रासलेल्या मानसिक स्थितीत तिने हे पाऊल उचलल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. या मुलीने नुकतेच आपल्या फेसबुक खात्यावरही ‘आयुष्याचा वैताग आला आहे, जगणे सोडावे वाटतेय’ अशी प्रतिक्रिया एका पोस्टद्वारे व्यक्त केली होती,
अशी माहिती पोलीस प्रमुख ऐदिल बोलहासन यांनी दिली. सावत्र पित्याने दुसरे लग्न केल्यानंतर घराकडे पाठ फिरवल्याने ही मुलगी नैराश्याच्या गर्तेत गेल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सांगा…’मृत्यू की जीवन?’.
आत्महत्येपूर्वी मुलीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर फॉलोवर्सना एक सवाल केला होता. ‘अत्यंत महत्त्वाची बाब आहे, पर्याय निवडण्यास मदत करा… ‘डी किंवा एल?’
असा विचित्र पर्याय तिने फॉलोवर्ससमोर ठेवत प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. इंग्रजी वर्णमालेतील ‘डी’ म्हणजे डाय अर्थातच मृत्यू आणि ‘एल’ म्हणजे लाईव्ह अर्थातच जीवन असा संदर्भ होतो.
त्यावर ६९ टक्के फॉलोवर्सनी ‘डी’म्हणजे मरण्याचा पर्याय सुचविला. त्यानंतर काही तासांतच मुलीने आत्महत्या केली.