मुंबई, दि. २१ : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१ हजार ७६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७५ हजार ११५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १२१ घटनांची नोंद झाली असून यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.