हे परिपत्रक फॉरवर्ड करू नये, तसेच त्यावर विश्वास ठेवू नये …

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे.

कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल केली जात आहे.

अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन नाही, असे स्पष्टीकरण प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आले आहे. फॉरवर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करून गैरसमज पसरवण्यात येत आहे. कारखाने सुरू केले आणि त्यातील कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई होईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे पसरवण्यात येत आहे.

कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करू नये, तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment