State Employee News : एसटी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. अनेकांना पगार वेळेवर मिळत नसल्याने गृहकर्जाचे हप्ते फेडताना नाकी नऊ येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही वेळेवर वेतन त्यांना मिळालेले नाही. या ठिकाणी विशेष बाब अशी की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी संप काळात प्रकरण न्यायालयात गेले असताना राज्य शासनाने घेतली होती.
गेल्या वर्षी न्यायालयात राज्य शासनाने पुढील चार वर्षे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगार सात ते दहा तारखेच्या दरम्यान केला जाईल आणि यासाठी आवश्यक 350 कोटी रुपयांचा निधी दरमहा वेळेवर मिळेल असं सांगितले होते. मात्र आता राज्य शासनाकडून न्यायालयात सांगितल्याप्रमाणे कृती होत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्याच्या पगाराबाबत तर शासनाकडून कर्मचाऱ्यांची निव्वळ हेळसांड करण्यात आली.
खरं पाहता एसटी महामंडळाकडून जानेवारी महिन्याच्या पगारासाठी आणि मागील काही महिन्यासाठी राज्य शासनाकडून अपूर्ण निधी मिळाला असल्याने एकूण एक हजार 18 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. एसटी महामंडळाने अर्थ खात्याकडे ही मागणी केली मात्र खात्याकडून एसटी महामंडळाकडे पूर्वीच्या निधीच्या खर्चाचे विवरणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून शासनाने पुरवलेल्या निधीच्या खर्चाचे विवरणपत्र देण्यात आले.
पण खर्चाचे विवरणपत्र सादर करूनही एसटी महामंडळाला मात्र 223 कोटी रुपयांचा निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अर्थ खात्याकडून वितरित करण्यात आला आहे. निश्चितच अर्थ खात्याकडून प्राप्त झालेल्या निधीमुळे जानेवारी महिन्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम ट्रस्टमध्ये जमा होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमागील साडेसाती अद्याप पूर्णपणे संपलेली नसल्याचे सांगितले जात आहे.
पण एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य शासनाकडून नीधीची उपलब्धता झाली असल्याने आज महामंडळातील कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे. दरम्यान आज आपण एसटी महामंडळाने अर्थ खात्याकडे जे काही खर्चाचे विवरणपत्र सादर केल आहे त्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
एसटी महामंडळाने अर्थ खात्याकडे सादर केलेल्या विवरण पत्रात नमूद केल्याप्रमाणे एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत 5172 कोटी रुपये उत्पन्न एसटी महामंडळाला झालं. त्यामध्ये 1145 कोटी रुपये राज्य शासनाचे वजा करतात चार हजार 27 कोटी रुपये महामंडळाकडे खर्चासाठी शिल्लक राहिले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2022 पर्यंत महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर बाबींसाठी एकूण 7252 कोटी रुपयांचा खर्च आला. म्हणजेच 3 हजार 228 कोटी रुपयांचा महामंडळाला तोटा झाला आहे.