Success Story : सध्या नवयुवक शेतकऱ्यांच्या तोंडून शेती व्यवसायात काही कस नाही, आता शेतीमध्ये काही राम उरला नाही, शेती करताना प्रगती साधन अशक्य आहे अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत. हवामानाच्या बदलाचा, नैसर्गिक आपत्तीचा, शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दराचा, शासनाच्या उदासीन धोरणाचा या सर्वांचा विचार केला तर या नवयुवक शेतकरी पुत्रांच्या या गोष्टी बहुतांशी वेळा आपण देखील मान्य करतो.
आपणही या शेतकरी पुत्रांनी सांगितलेल्या अडचणींचा पाढा खराच आहे असं समजतो. निश्चितच काही अंशी या अडचणी शेती व्यवसायात यशस्वी होण्यापासून शेतकऱ्यांना रोखत आहेत. मात्र, या अडचणींवर मात करूनही शेती व्यवसायातून करोडो रुपयांची कमाई होऊ शकते, करोडो रुपयांचा टर्नओव्हर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कमी शेत जमीन असली तरी देखील शेती व शेतीशी निगडित इतर उद्योगधंद्यात उतरून करोडो रुपयांचा टर्नओव्हर केला जाऊ शकतो.
आता अनेकांना लाखो रुपयांपर्यंतचा टर्नओव्हर शेतीमधून केला जाऊ शकतो इथपर्यंत बोललेल पटेल मात्र करोडो रुपयांचा टर्नओव्हर म्हटलं म्हणजे अनेक लोक येड्यात काढतील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील दीड एकर शेत जमिनीच्या मालक असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने ही अशक्य बाब शक्य करून दाखवली आहे. तसेच जे शेतकरी शेती व्यवसायात आता राम उरलेला नाही असं म्हणतात त्यांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. विशेष बाब म्हणजे औरंगाबाद मधील हा शेतकरी बारावी नापास आहे. बारावी नापास असतानाही व्यवसायात साधलेली ही प्रगती त्यांना शेती व्यवसायात 100 गुणांनी पास करत आहेत. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथील संतोष आग्रे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
संतोष यांच्याकडे वडीलोपार्जित मात्र दीड एकर शेत जमीन आहे. घरी परिस्थिती जेमतेम, शेती ही कमी यामुळे त्यांनी दहावीनंतर नोकरी करण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने वाटचाल केली. औरंगाबाद मध्ये त्यांनी तब्बल सात ते आठ वर्षे एका खाजगी कंपनीत नोकरी केली. आता सात आठ वर्षे नोकरी केल्यानंतर गावी परतुन काहीतरी शेतीशी निगडित काम करायचं असं त्यांनी ठरवलं. मात्र, हे बोलताना जेवढं सोपं आहे तेवढ संतोष यांना प्रत्यक्षात करायला खूपच कठीण होतं. कारण की, गावी परतायला घरच्यांचा विरोध होता.
शिवाय गावी परतून शेती जेमतेम असल्याने एवढ्या कमी शेतीत निर्वाह कसा भागवायचा हाच मोठा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उपस्थित झाला होता. मात्र या सर्व विचारांना तिलांजली देत त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी परतल्यानंतर मात्र संतोष यांच्यासाठी सुरुवातीचा काही काळ मोठा कष्टाचा होता. सुरुवातीचे सहा वर्षे गावी शेळीपालन व्यवसाय केला. या शेळी पालन व्यवसायामुळे त्यांना किती उत्पन्न मिळालं हा तर वेगळा विषय झाला मात्र ओळखी या व्यवसायामुळे अमाप झाल्यात. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांशी त्यांच्या ओळखी झाल्याने शेती व शेती व्यवसायातील संधी त्यांच्या पुढ्यात अंथरण्याचं काम या जाणकारांनी केलं.
यापैकी आपल्याला परवडणारी आणि झेपावणारी शेती व्यवसायातील संधी शोधली आणि ऑक्टोबर 2022 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी अर्थातच एपीओ स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या कामी त्यांना दीपक जोशी नामक एका हितेशी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. खरं पाहता त्यांना एफपीओ म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मात्र त्यांना या सर्व बाबींची दीपक जोशी यांच्याकडून माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या गावातील सुशिक्षित सवंगड्यांना सोबत घेत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी आपल्या चुलत भावंडांना देखील सोबतीला घेतलं. त्यांचे चुलत भावंडे हे चांगले उच्चशिक्षित होते मात्र काहीही काम न करता गावातच फिरत असायचे. काहींचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले होते, तर काहींचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण झाले होते अशा परिस्थितीत त्यांना काहीतरी उद्योगधंदा उपलब्ध होईल आणि आपल्याला देखील त्यांची मोलाची साथ लाभेल आणि आपण सोबत मिळून या कंपनीचा डोलारा सांभाळू शकतो या हेतूने त्यांनी आपल्या चुलत भावंडांना सोबत घेत या कंपनीची पायाभरणी केली.
अशा पद्धतीने सवंगडी, चुलत भावंडे असे एकूण दहा लोक सोबतीला घेत संतोष यांनी बाभूळगावकर मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अशा नावाची एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापित केली. ऑक्टोबर 2021 मध्ये या कंपनीची नोंदणी करण्यात आली. सुरुवातीला प्रत्येक सदस्याने दहा हजार रुपये जमा करून एक लाख रुपयांचे भांडवल उभारले. यानंतर त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून मका खरेदी सुरू केली. सुरुवातीला मका खरेदीसाठी त्यांनी उभारलेले भांडवल वापरण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीमध्ये सामील झालेल्या सभासदांचेच सुरुवातीला मका खरेदी झाली.
यामुळे या खरेदी केलेल्या मकाला भांडवल लागले नाही. यानंतर दीड दोन महिन्यांनी या पहिल्या खरेदीची रक्कम देखील संबंधितांना देण्यात आली. यानंतर या कंपनीचा डोलारा संपूर्ण गावभर पसरला आणि गावातील संपूर्ण लोक या कंपनीकडे आपला माल विकू लागले. गेल्या वर्षी मात्र गावातील लोकांनी या कंपनीमध्ये विश्वास दाखवला होता, पण यंदा आजूबाजूच्या चार खेड्यातील लोकांनी आपला शेतमाल विक्रीसाठी या कंपनीकडे आणला आहे. कंपनीने आजूबाजूच्या चार खेड्यातील शेतकऱ्यांकडचा मका आणि सोयाबीन खरेदी केला आहे.
बाकी व्यापाऱ्यांपेक्षा दहा-वीस रुपये अधिक दर या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या कंपनीकडे आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. संतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत कंपनीने 1000 टन शेतमाल खरेदी केला आहे. गहू, मका, सोयाबीन, तूर, हरभरा कंपनीने खरेदी केला असून शेतकऱ्यांना रास्त भाव दिला आहे. विशेष म्हणजे कंपनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल एक कोटीच्या पुढे टर्नओव्हर गेला आहे.
तसेच या कंपनीने यावर्षी अकरा लाख रुपये खर्चून वजन काटा देखील घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतमाल मोजण्यासाठी दुसऱ्या गावी जावे लागत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. या कंपनीमुळे संतोष यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल झाला आहे. त्यांनी आता कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला असून मळणी यंत्र देखील खरेदी केल आहे. संतोष यांच्या अर्धांगिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे दहा ते बारा लाख रुपये शिल्लक रक्कम जमा झाली असून त्यांना लवकरच आता त्यांच्या स्वप्नातलं घर बिल्डअप करायचे आहे.
निश्चितच, बारावी नापास असलेल्या या शेतकऱ्याने शेती व्यवसायात केलेली ही कामगिरी चांगल्या चांगल्या प्रयोगशील आणि सुशिक्षित शेतकऱ्यांना देखील विचारात पाडणारी आहे. संतोष यांच्या आयुष्यात या एका निर्णयामुळे मोठा बदल तर झालाच आहे शिवाय जे लोक त्यांच्या सोबतीला आले आहेत त्यांचे देखील आयुष्य परिपूर्ण बदलून गेले आहे.