रमजाननिमित्त अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिल्या शुभेच्छा

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. २४ : उद्यापासून (शनिवार दि. २५ एप्रिल) सुरु होणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी मुस्लिम बांधवांसह सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

याबरोबरच या महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्यानुषंगाने मुस्लिम बांधवांनी या सर्व नियमांचे पालन करत नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र येऊ नये. पार्किंग, इमारतींचे टेरेस, मोकळी मैदाने, रस्ते आदींसारख्या ठिकाणीही एकत्र जमा न होता सर्वांनी घरातच नमाज, सहेरी, रोजा इफ्तार, तरावीहची नमाज यांचे पठण करावे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुस्लिम समाजातील धर्मगुरु, स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांनीही मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता घेण्याबाबत आणि सार्वजनिक ठिकाणी नमाज, तरावीह पठण किंवा रोजा इफ्तार कार्यक्रम न करता ते घरीच करण्याबाबत सांगावे, असे आवाहनही मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment