Bharat Jodo Yatra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असे ते पायी चालत गेले. असे असताना काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राहुल गांधी यांनीही पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना या यात्रेबाबत संकेत दिले होते. यामुळे आता ही यात्रा कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेस अधिवेशनाच्या समारोपानंतर रमेश म्हणाले, ‘यात्रा अरुणाचलच्या पासीघाट येथून सुरू होऊन गुजरातच्या पोरबंदर येथे संपण्याची शक्यता आहे. त्याबद्दल खूप उत्साह आहे. याबाबत अजून मत जाणून घेतली जात आहेत.
व्यक्तिशः याची गरज आहे, असे आपल्याला वाटते. येत्या काही आठवड्यांत याबाबत सर्व नियोजन केले जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले.
ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामानाचा विचार करता यात्रेसाठी वाहतुकीच्या विविध पद्धती वापरल्या जाऊ शकतात. ही पदयात्रा असेल. ‘भारत जोडो यात्रे’च्या तुलनेत या यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी असू शकते, असेही रमेश म्हणाले.