Success Story : मराठवाडा आणि विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहत ते शेतकरी आत्महत्येच भयाण वास्तव. मराठवाड्यात आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. यासाठी उपाययोजना करणे अनिवार्य असून शासनाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्यता आणून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्या साठी कुख्यात बनलेला विदर्भ आणि मराठवाडा आता राज्यातील तसेच देशभरातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी विकासाची वाट दाखवत आहे. वर्धा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील असंच काहीसं काम केलं आहे.
जिल्ह्यातील सेवाग्राम जवळील पूजई या गावातील प्रयोगशील शेतकरी मिलिंद भानसे यांनी मेक्सिकन पेपरीका या जातीच्या मिरचीची शेती सुरू केली आहे. खरं पाहता या जातीच्या मिरच्या या चवीला सौम्य तिखट असतात. यामध्ये औषधी गुणधर्म मात्र मुबलक प्रमाणात आढळतात. या मिरच्या आपल्याकडे एवढ्या बाजारात पाहायला मिळत नाही मात्र विदेशात या मिरचीचा मोठा खप आहे. प्रामुख्याने फास्ट फूड मध्ये या मिरच्या वापरल्या जातात. औषधी गुणधर्म असल्याने बाजारात याला मागणी राहते. या मिरचीला चांगला दरही मिळतो.
मिलिंद यांनी देखील बाजारात चांगली मागणी असल्याने या मिरचीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या दोन एकर शेतात याची लागवड केली आहे. मिलिंद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या मिरची बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याची बियाणे मागवलीत. यानंतर ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार केली आणि रोपांची निर्मिती करण्यात आली. मग नोव्हेंबर महिन्यात मिरचीची लागवड केली. दोन बाय सहा इंच या अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली असून एका एकरात चाळीस हजार रोपांची लागवड झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या दोन एकरासाठी त्यांना जवळपास सव्वा लाखाचा खर्च आला असून यामध्ये अजून वाढ होणार आहे. हार्वेस्टिंगसाठी मजुरी म्हणून आणखी खर्च लागणार आहे. मात्र पिकातून त्यांना अडीच टन इतक उत्पादन अपेक्षित असून यापासून सात ते साडेसात लाखांपर्यंतची कमाई त्यांना होण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता पाच ते साडेपाच लाख रुपये निव्वळ नफा राहू शकतो असं त्यांनी सांगितलं. निश्चितच एकीकडे शेतीमध्ये सातत्याने नैसर्गिक संकटांमुळे नुकसान सहन करावे लागत असतानाच मिलिंद यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.