Cotton Market News : महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी राज्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होते. गत हंगामात चांगला भाव मिळाला असल्याने या हंगामात याची लागवड वाढली आहे. यंदा मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत खूपच कमी दर कापसाला मिळत आहे. सध्या देशातील एकूण उत्पादनाच्या निम्मे कापूस विक्री झाला असल्याचे सांगितले जात आहे. हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील शेतकऱ्यांनी 160 लाख कापूस गाठीची विक्री केली आहे.
व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होळीनंतर कापसाची विक्री वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात मात्र कापसाची आवक नरमलेली होती. दर देखील कमीच होते. यावर्षी देशात 320 लाख कापूस गाठीं उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज जर सत्यात उतरला तर आत्तापर्यंत निम्मे कापूस शेतकऱ्यांनी विक्री केला आहे. यंदा मात्र कापूस निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहणार असल्याचे मत काही तज्ञ वर्तवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी पर्यंत आठ लाख कापूस गाठी निर्यात झाल्या आहेत. आणखी 22 लाख कापूस गाठी निर्यात होऊ शकतात असा अंदाज आहे. म्हणजे या हंगामात तीस लाख कापूस गाठी निर्यात होईल असे मत व्यक्त होत आहे. तज्ञ लोक सांगत आहेत की जागतिक पातळीवर महागाई वाढली आहे, त्याचा परिणाम म्हणून कापूस मागणी कमी आहे. शिवाय रशिया आणि युक्रेन युद्धामुळे देखील कापूस मागणीवर कुठे ना कुठे दबाव आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सध्या जागतिक बाजारात कापूस दरात चढ-उतार पहावयास मिळत आहे.
मात्र तज्ञ लोकांनी आता कापूस दर नरमणार नाहीत असे संकेत दिले आहेत. कापसाला या हंगामात साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळण्यास पोषक परिस्थिती असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या मात्र कापसाचे भाव यापेक्षा कमी आहेत. काल झालेल्या लिलावाचा विचार केला असता काल देशांतर्गत 7800 ते 8300 दरम्यान कापसाला भाव मिळाला आहे. वास्तविक यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासूनच सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत.
सध्या देशांतर्गत सूतगिरण्या मात्र 80% क्षमतेने सुरू आहेत. अशातच मात्र बांगलादेश मधून कापसाची मागणी वाढत असून गेल्या महिन्यात कापसाच्या ऑर्डर तेथून आल्या आहेत. काही तज्ञांकडून भारतीय कापूस सध्या स्थितीला जागतिक कापसाच्या तुलनेत महाग असल्याने निर्यातीसाठी अडचणी तयार होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
निश्चितच या हंगामात गेल्या हंगामा प्रमाणे कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळणार नाही. परंतु कापूस साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या बाजार भावात विक्रीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. यामुळे बाजारपेठेचा आढावा घेत शेतकऱ्यांनी आपल्या विक्रीचे नियोजन आखावे असे मत व्यक्त होत आहे.