कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर, दि. २६ : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

औरंगाबादहून मुंबईकडे जाताना श्री.टोपे हे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,

महानगर पालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, राज्य वैद्यकीय पथकाच्या सदस्य डॉ.पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीपकुमार मुरांबिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

त्यानंतर, श्री.टोपे यांनी आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोणत्या भागात किती रुग्ण आढळून आले, सध्याची परिस्थिती, औषधांची उपलब्धता आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. कोविड केअर सेंटरची व्यवस्था, ते कार्यान्वित झालेत का, आदीबाबत त्यांनी विचारपूस केली.

आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीतून आरोग्य सुविधा बळकटीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कंटेटमेंट झोन, तेथील परिस्थिती याची माहितीही त्यांनी घेतली.

ते म्हणाले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी कंटेटमेंट झोन भागात कडकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री.टोपे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment