पुराचा धोका ओळखून ग्रामस्थांना स्थलांतरण बंधनकारक – पालकमंत्री सतेज पाटील

Ahmednagarlive24
Published:

कोल्हापूर, दि.२७ : गेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून सर्व विभागांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आठ दिवसात विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी.

पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी प्रशासनामार्फत परिस्थितीनुरुप ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे

अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील धरणांचा सद्याचा पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे बोटी आहेत त्या सर्वांची नोंद ठेवून यादी बनवावी. त्याचबरोबर जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरूस्ती करून त्या सज्ज ठेवाव्यात.

ग्रामीण भागात विशेषत: शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या होत्या. त्याबाबत तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पुशसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा सर्वंच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी.

• 15 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीत शासकीय अधिकारी-

कर्मचाऱ्यांनी  नेमणुकीच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक.

  • शिरोळ, करवीर, राधानगरी आदी तालुक्यात योग्य ठिकाणे शोधून हेलिपॅड तयार करावेत.
  • पशुसंवर्धन विभागाने जिल्हा दूध संघाच्यामाध्यमातून जनावरांचे सर्वेक्षण करावे.
  • पाटबंधारे विभागाने 2005, 2019 च्या महापुराचा अभ्यास करून नियोजन करावे.
  • 43-44 फूट पातळी झाल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर करावे.
  • मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी ठेवावी.
  • खासगी रूग्णालयांनी धोका पातळी पूर्व रूग्ण दाखल करून घेवू नये.
  • बोटींची संख्या वाढवावी.
  • मोठी रूग्णालये, मोठ्या गृहनिर्माण संस्था यांनी स्वतंत्र बोटीची व्यवस्था करावी.
  • जिल्ह्यातील थार वाहनांची यादी तयार करावी.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, पाटबंधारे विभागाने जूनच्या आत धरणांच्या दुरूस्तीबाबत विशेषत: फाटकवाडी, बर्की, धरणाच्या दुरूस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत.

पडणाऱ्या पावसाबाबत आणि करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत स्वतंत्रपणे एफएम वाहिनी सुरू करण्याचा विचार आहे. सर्व तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांनी गेल्यावेळी आलेल्या अडचणींबाबत आणि अल्पमुदतीत उपाय-योजना करण्याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. कमी कालावधीत जादाचा पाऊस गतवर्षी पडला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाने आगाऊ सूचना देण्याबाबत नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment