अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक, ग्रामस्थ भयभीत !

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गेल्या एक महिन्यापासून अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून हा मूर्खपणा कोण करतो आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असुन आवश्यक ती पावलेही उचलली आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लॉकडाऊन असल्याने लोक घरातच थांबलेले आहेत. अशातच सोनेवाडीमध्ये गेल्या एक महिन्यापासून विचित्र प्रकार घडत आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून दररोज रात्री आठ वाजेनंतर दहा वाजेपर्यंत दगड मारण्याचा प्रकार होतो. त्यामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहे.

गणपती मंदिर परिसरातील सोमनाथ पुंजा जावळे, अण्णासाहेब सुखदेव घोंगडे, बाळासाहेब विठ्ठल जावळे, संदीप मंनराज जावळे आदि नागरिकांच्या घरावर व घराच्या बाजूला ही दगडफेक होते. दगडफेकीमुळे अण्णासाहेब सुखदेव घोंगडे यांच्या घरावरील पत्रे फुटले तर सोमनाथ जावळे यांच्या घराची काच फुटली आहे.

बाळासाहेब जावळे व सिताराम जावळे यांची मुले व त्यांच्या पत्नी अंगणात बाहेर स्वयंपाक करीत असताना एकदा दगडफेक झाली. सुदैवाने दगड कोणाला लागला नाही.

सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, पोलीस पाटील दगू गुडघे व काही नागरिक घटनास्थळी गेले असता त्या अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला. दगडफेकीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा जो कोणी व्यक्ती आहे,त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment