कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथिल करा

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड 1 जून 2018 पासून नुतणीकरण करण्यात आलेले नाही.

यातील अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणी कार्ड नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतू यवतमाळ जिल्ह्यात गत वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकांची आचारसंहिता आणि आता कोरोनाचा संसर्ग यामुळे या कार्डांचे नूतनीकरण करण्याचे राहिले आहे.

त्यामुळे कामगारांच्या नोंदणीकार्डच्या नूतनीकरणाची अट शिथिल करण्याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मध्यंतरीच्या कालावधीत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, तद्नंतर यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची पोट निवडणूक तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे बांधकाम मजूरांना ऑनलाईन पद्धतीने कार्ड नूतनीकरण करता आले नाही.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कामगार अधिकारी यांनी कार्ड नूतनीकरण करण्याची कार्यवाही बंद केली आहे. याशिवाय आवश्यक सुविधा, अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कारणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे अद्यापही 80 टक्के कार्ड नूतनीकरण करण्यात आले नसून आता ते होण्याची शक्यता नाही.

अनेक बांधकाम कामगाराचे कार्ड नूतनीकरण न झाल्यास त्यांना शासनाच्या पुढील योजनेचा फायदा होणार नाही. तेव्हा वरील सर्व बाबींचा विचार करून यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे कामगार कार्ड 1 जून 2018 पासून, नूतनीकरणाची अट शिथिल करून यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजूरांना दिलासा द्यावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी कामगार मंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment