Imd Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात गारपीट देखील होत आहे. आता मान्सून सुरू होण्यास मात्र एक महिन्याचा कालावधी बाकी असतांनाच अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
या पावसाने रब्बी हंगामातील सर्वच शेती पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे फळबागा देखील प्रभावीत झाल्या आहेत. अशातच आता भारतीय हवामान विभागाकडून 7 मे 2023 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज तीन मे 2023 अर्थातच बुधवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता राहणार आहे. तसेच काही भागात जोरदार वारे देखील वाहणार आहेत.
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक सजग राहण्याची आवश्यकता राहणार आहे. हवामान विभागाने परतवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज तीन मे अर्थातच बुधवारी विदर्भात ताशी 40 ते 50 किलोमीटरने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे.
तसेच यवतमाळ आणि नागपुर या दोन जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे. याशिवाय आज धुळे नंदुरबार पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर परभणी आणि बीड या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय चार मे आणि पाच मे रोजी मराठवाड्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 6 आणि 7 मे रोजी मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
निश्चितच, हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता अद्याप कायम आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच सामान्य जनतेला विशेष सतर्क रहावे लागणार आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे येणारा मान्सून प्रभावित होईल आणि कमी पाऊस मानसून काळात पडेल असे भीती वाटत आहे. मात्र याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पडत असलेल्या पावसामुळे येणारा मान्सून प्रभावित होणार नाही.