Mhada News : म्हाडाच्या मुंबई मंडाळाकडून लवकरच घर सोडत काढली जाणार आहे. जवळपास 4 हजार 83 घरांसाठी ही सोडत राहणार असून 22 मे रोजी या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
जाहिरात जारी झाल्याच्या दिवसापासूनच मुंबई मंडळातील घरांसाठी इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. जवळपास 2019 पासून मुंबई मंडळाअंतर्गत घरांची लॉटरी काढण्यात आलेली नव्हती. अशा परिस्थितीत या घर सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळणार आहे.
दरम्यान म्हाडाने मुंबई मंडळाच्या घर सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वीच म्हाडाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे काही लोकांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर काही लोकांना या निर्णयामुळे फायदा देखील होणार आहे.
ज्या लोकांनी आधीच सिडको किंवा म्हाडा कडून कोणत्याही मंडळात घर घेतलं असेल तर अशा लोकांना आता म्हाडाच्या नवीन सोडतीमध्ये घर घेता येणार नाही. असा निर्णय 2019 मध्ये झाला होता मात्र याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता राज्य शासनाच्या या निर्णयाची म्हाडाकडून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
यासाठी म्हाडाच्या नवीन संगणकीय प्रणाली बदल केला जाणार असून याची सुविधा तिथे उपलब्ध राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडा व इतर कोणत्याही सरकारी योजनेतून एका कुटुंबाला केवळ एकच घर घेता येईल असा निर्णय राज्य शासनाने 2019 मध्ये घेतला.
11 सप्टेंबर 2019 रोजी याचा जीआर देखील राज्य शासनाने निर्गमित केला. मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नव्हती. आता मात्र याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. म्हाडाच्या नव्या संगणकीय प्रणालीत अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे.
म्हणजे आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना याआधी अर्जदाराने सरकारी योजनेअंतर्गत घर प्राप्त केले आहे का असे विचारले जाणार आहेत. याचे उत्तर जर नाही असेल तर अशाच अर्जदाराला पुढे फॉर्म भरता येणार आहे.
परंतु ज्या अर्जदारांनी घराचा लाभ घेतला असेल आणि नाही म्हटले असेल तर पॅन कार्डच्या आधारे अशा अर्जदारांची ओळख देखील होणार आहे आणि अशा अर्जदारांना फॉर्म भरता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या म्हाडाकडून घर घेतलेल्या लाभार्थ्यांची सर्व माहिती संगणकीय प्रणालीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
म्हणजे आता म्हाडाच्या यापूर्वीच्या सोडतीतील लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीत समाविष्ट होणार आहे. यामुळे आता सरकारी योजनेतून केवळ एका कुटुंबाला एकच घर उपलब्ध होणार आहे. याचाच अर्थ आता खऱ्या गरजूंनाच घराची उपलब्धता होणार आहे.
दरम्यान ज्या व्यक्तींनी म्हाडा किंवा इतर सरकारी योजनेतून आधीच घरांचा लाभ घेतला असेल आणि त्यांनी आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, नवीन सोडतीत देखील घराचे लाभार्थी ठरले तर अशा लोकांविरोधात कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.