Ahmednagar News :- छत्रपती संभाजीनगर येथून केरळला इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याने टैंकर पलटी होऊन टँकरला आग लागली. या वेळी टँकरमधील चालक पळून गेला, चार प्रवाशांना इतरांनी काचा फोडून बाहेर काढले मात्र एक महिला व एक युवक दोघेही टैंकरखाली अडकल्याने जळून खाक झाले.
सहकारी चालक गणेश रामराव पालवे, (चय ४२) रा. पालवेवाडी, ता. पाथर्डी व सुरय्या बशीर शेख, रा. माळीबाभुळगाव, अशी मयतांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादासाहेब अंकुश केकाण, रा. पालवेवाडी हा चालक औरंगाबाद येथून केरळला इथेनॉलचा टँकर घेऊन चालला होता. त्याच्या सोबत गणेश रामराव पालवे हादेखील सहचालक होता.
पाथर्डी शहरातून गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता संस्कार भवन येथून लहू पवार, सुमन पवार, कमल पवार जगदिश पवार, रा. पैठण, असे चौघेजण व सुरय्या बशीर शेख रा. माळीचाभुळगाव, असे पाच प्रवाशी टँकरमध्ये बसले.
काही क्षणात टँकरने पेट घेतला
१०.३० वाजता केळवडी शिवारात व चकेवाडीचा घाट सुरू होताच पहिल्याच वळणावर संरक्षक कठडे तोडून टँकर रस्त्याच्या खाली गेला व काही क्षणात टँकरने पेट घेतला. घटना घडताच शेजारी राहणाऱ्या आठरे कुटुंबाने धाव घेतली.
रस्त्याने जाणाऱ्या अशोक गाढवे रा. पाण्याचे धामणगाव ता. आष्टी या मोटारसायकलस्वाराने व आठरे परिवाराने पेटलेल्या टँकरच्या समोरच्या काचा फोडल्या व कॅबिनमधील लहू पवार, सुमन पवार, कमल पवार, जगदिश पवार रा. पैठण, असे चौघांना बाहेर काढले.
केवळ कवटी पोलिसांना आढळली…
दोघेजण मात्र टँकर खाली सापडल्याने जळून खाक झाले. सुरय्या शेख हिची केवळ कवटी पोलिसांना आढळली आहे. गणेश पालवे याचा चेहऱ्याचा काही भाग व छातीचा काही भाग मातीत मिसळलेला होता. इथेनॉल ज्वलनशील असल्याने त्याची आग पाण्याने विझवता येत नसल्याने फायर ब्रिगेडचा फारसा फायदा झाला नाही.
टँकरच्या शेजारी लागेली आग मात्र विझविली गेली. माहिती मिळताच पोलि घटनास्थळी आले. क्रेनच्या सहाय्याने टैंकर सरळ केल्यानंतर एक अर्धवट जळालेला मृतदेह व एक जळालेली कवटी, असे पोलिसांना आढळले.
पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुध्द पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॅकरच्या कॅबिनसमोरील काचा फोडल्या आणि…
अशोक गाढवे रा. पाण्याचे धामणगाव, ता. आष्टी, हा युवक मोटारसायकलस्वार परभणीला चालला होता. टैंकर पलटी झाल्यानंतर पहिला धाऊन जाणारा हा युवक आहे. त्याने जिवाची पर्वा न करता जळत्या टॅकरच्या कॅबिनसमोरील काचा फोडल्या व त्यातील पवार कुंटुबातील चार जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
स्वतःच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता अशोकच्या अलौकिक कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले आहे. अशोक गाढवे हा पवार कुटुंबासाठी देवदूत ठरला आहे.