Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagarlive24
Published:
Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो संपला का पहा, नसेल संपला तर संपवा, असे नगरसेवक स्वप्नील शिंदे हा आरोपींना सांगत होता. एकविरा चौकात शनिवारी रात्री हा थरार रंगला होता.

याप्रकरणी अंकुश चत्तर यांचे दाजी बाळासाहेब भानुदास सोमवंशी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन शिंदे याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपा नगरसेवक स्वप्निल शिंदेसह पाच जणांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. वैदवाडी), अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) अशी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नावे आहेत.

हल्ला करून पसार झालेल्या स्वप्निल शिंदेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे.

स्वप्नील शिंदे कोण आहे ?
हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेला स्वप्नील शिंदे हा प्रभाग चार मधील भाजपचा नगरसेवक आहे. महानगरपालिकेत भाजपचा गटनेता म्हणूनही त्याने काम पाहिले आहे. भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्याचे जवळकीचे संबंध आहेत.त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe