Maharashtra News : “कौन बनेगा ‘च्या यशोगाथा आता देशातील सामान्य कष्टकरी शेतकरी लिहायला लागला असून अर्थात ती संधी त्यांना दिली आहे टोमॅटो पिकाने. सहसा नाशिवंत कृषीमालाचा भाव काही दिवसांपुरताच वाढत असतो,
पण यंदा टोमॅटोने बाजारत खूप दिवस *भाव’ खाल्ला असून देशातील अनेक कष्टकऱ्यांना करोडपती केले आहे. आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यातील एका शेतकर्याला तर या टोमॅटोने थोडेथोडके नव्हे तर चार कोटी मिळवून दिले असून हे उत्पन्न त्यांना अवघ्या ४५ दिवसांत मिळाल्याचा दावा केला जात आहे.
मध्यमवर्गीय शहरवासीयांचे बजेट टोमॅटोने बिघडले असले तरी शेतकरी मालामाल झाले आहेत. अनेक मध्यमवर्गीयांनी टोमॅटो खाणेच बंद केले असले तरी शेतकऱ्यांमध्ये हे पीक सध्या लोकप्रिय ठरले आहे. गेले अनेक आठवडे देशभरात टोमॅटोचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असून अजूनही कमी होण्याची चिन्हे नाहीत. या तेजीच्या रथावर आंध्र प्रदेशातील मुरली नावाच्या या शेतकर्याने ४५ दिवसांत ३५ तोडण्या करत विक्रमी उत्पन्नाची नोंद केली.
दरम्यान, कारकामंडल गावातील हा ४८ वर्षीय शेतकरी संयुक्त कुटुंबात राहत असून त्यांच्याकडे एकूण २२ एकर शेतजमीन आहे. या कुटुंबाचे प्रमुख उत्पन्नाचे साधन शेतीच आहे. वडिलांकडून शेतीचा वारसा घेताना टोमॅटोचे पीक ५० हजार रुपये कमवून देते, एवढीच माहिती मुरली यांना होती.
पण याच पिकातून इतके भरीव उत्पन्न मिळाल्याने त्यांच्यासह सर्वच कुटुंबीय आनंदून गेले आहेत. गेली आठ वर्षे मुरली यांचे कुटुंब टोमॅटोची लागवड करते आणि जवळच्याच कोलार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले उत्पादन विकते. यंदा मात्र बाजार समितीमध्ये त्याच्या टोमॅटो पिकाला चांगली किंमत मिळाली. शेतातील टोमॅटोच्या अजून १५ ते २० तोडण्या शिल्लक असून त्यातूनही दीड-दोन कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
या कुटुंबाकडे १२ एकर जमीन असली तरी काही वर्षांपूर्वी ‘जवळचीच १० एकर जमीनही त्यांनी खरेदी केली होती. मात्र कृषी माल दरातील घसरण आणि वीजपुरवठ्यामुळे खंडित होणारा पाणीपुरवठा यामुळे त्याला शेतीमध्ये मोठे नुकसान झाले होते.
या परिस्थितीत तब्बल दीड कोटी रुपयांच्या कर्जांचे ओझेही त्याच्यावर पडले. मात्र हा हाडाचा शेतकरी खचला नाही. त्याला यंदा टोमॅटोने अशी साथ दिली की, त्याने दीड कोटींचे कर्ज फेडलेच, पण उर्वरित रकमेची गुंतवणूक फळबाग लागवडीमध्ये करण्याचा त्याचा विचार सुरू आहे.