Maharashtra News : रायगड जिल्ह्यात उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती व दरडी कोसळण्याचे सातत्य लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांच्याकडे महाड उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार १५ दिवसांसाठी पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट बंद करण्यात आला आहे.
सद्यस्थितीमध्ये तळ कोकणासह रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असून यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी महाडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी अर्ज करून आंबेनळी घाट बंद करण्याबाबत कळवले आहे.
त्यानुसार पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट रस्ता हा सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीसाठी १५ दिवसांसाठी पूर्णपणे बंद करावा, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे. त्यानुसार या कार्यालयाच्या शुक्रवार, २८ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार पुढील १५ दिवसांकरता पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.
गेले दहा दिवस संततधार कोसळणारा पाऊस, भूस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.