Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतजमीन मोजणी ऑनलाईन होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record : १ ऑगस्टपासून आता शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही. शेतजमीन मोजणीचे कामकाज ऑनलाईन होणार आहे, अशी माहिती राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.

त्यासाठी आता शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही व मोजणीसाठी सहा महिने प्रतिक्षा करण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांना सहजा सहजी आपले शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना आता जर आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यावर त्या शेतकऱ्यांचे शेतजमीन मोजणीचे पैसे बँकेत न जाता ऑनलाईन पद्धतीने भरून शेतकऱ्यांना तात्काळ मोबाईलवर आपल्या शेतीची मोजणीची तारीख मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात येईल व पुढील १५ दिवसाच्या आत सदरील जमिनींची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचा अचूक नकाशा कार्यालयात न येता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशामध्ये क्यूआर कोडच्या मदतीने अक्षांश व रेखांश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात ५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली असून मोजणीसाठी खासगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर दिला जात आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणीसाठी होणारी ससेहोलपट थांबणार असून या योजनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असे श्री. थोरात यांनी सांगितले.