संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

Ahmednagarlive24
Published:

गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले.

यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात 10 हजार बसेस द्वारे संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली येथे कोरोनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना पुढील चार पाच दिवसात त्यांच्या स्वजिल्हयात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लक्ष घालून विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

मुख्यंमत्र्यांनी मदत व पुनवर्सन विभागाला कोणत्याही प्रकारे प्रवाशांना तिकीटांचा भुर्दंड पडणार नाही अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.

यानुसार एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे.

ही कोरोना लढाई जिंकण्यासाठी राज्यात प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्य करत असून आपण ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रशासन व शासनाच्या चांगल्या योगदानामुळे राज्यात कोरोना मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. इतर देशांच्या तुलनेत राज्य शासन कोरोना बाधितांची संख्या रोखण्यातही यशस्वी झाले आहे.

प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन जनतेकडून झाल्याने आपण ही आकडेवारी कमी ठेवण्यात याशस्वी झालो.

राज्य शासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करून तसेच आवश्यक उपाययोजना करून आपण ही कोरोना लढाई निश्चितच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यातून आपला देश, आपले राज्य व गाव वाचवू असे ते म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यावेळी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment