तालुक्यातील खंडाळा गावातून हरवलेल्या दोन शालेय अल्पवयीन मुलींना शोधण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता खंडाळा येथून शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुली कोणाला काही न सांगता गायब झाल्या.
मुली हरवल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.
श्रीरामपूर बस स्थानकातून मुली पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेक केले असता उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी पुणे बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले.
तेव्हा या दोन्ही मुली सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावी जाणाऱ्या बसमध्ये चढल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक खंडाळा गावात गेले असता दोन्ही मुली तेथे मिळून आल्या.
पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पोलीस नाईक साईनाथ राशिनकर, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे, कैलास झिने, कुलदीप पर्वत, योगिता निकम यांनी भाग घेतला..