DA Hike : देशात महागाई गगनाला भिडली असतानाच केंद्र सरकार आपल्या १ कोटीहून अधिक कर्मचारी तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता (डीए) वाढीची भेट लवकरच देणार आहे. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून तो ४५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के आहे. श्रम ब्युरोद्वारे दर महिन्याला जारी होणाऱ्या ‘औद्योगिक श्रमिक ग्राहक मूल्य निर्देशांक’ (सीपीआय- आयडब्लू) च्या अधारे निश्चित केला जातो.
जून २०२३ साठी ‘सीपीआय- आयडब्लू’ ३१ जुलै २०२३ रोजी जारी करण्यात आला. तेव्हा ४ टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, अर्थ मंत्रालयाचा विभाग आपल्या महसुलाचा आढावा घेत महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव तयार करणार आहे. त्यानंतर, तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समोर मांडण्यात येईल. तो मंजूर झाल्याने १ जुलै २०२३ पासून वाढीव महागाई भत्ता लागू असणार आहे.