जर आपण एकंदरीत पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचा विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचं मूल्य किंवा त्यांचे महत्त्व आपल्याला माहिती नाही. परंतु अशा गोष्टींचे महत्त्व आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची असलेली किंमत आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असते. साधारणपणे भारतामध्ये जर आपण लाकडांच्या मूल्याचा विचार केला तर चंदन त्यातल्या त्यात लाल चंदन आणि सागाचे लाकूड आपल्याला माहित आहेत. कारण या लाकडांचे मूल्य खूप जास्त असते व त्यांचा उपयोग देखील आपल्याकडे सर्वश्रुत आहे.
अशा मूल्यवान लाकडांचा उपयोग हा प्रामुख्याने घरामध्ये सुंदर फर्निचर, दरवाजे तसेच इतर आकर्षक लाकडी वस्तू बनवण्यासाठी आणि काही ठिकाणी तर नवीन घर बांधण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. जर महाग असलेल्या लाकडांचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येतं लाल चंदन. कारण लाल चंदनाची किंमत देखील खूप असून साधारण सगळ्यात महाग लाकूड म्हणून लाल चंदनाला मानले जाते. परंतु मूल्याच्या दृष्टिकोनातून या पृथ्वीतलावर विचार केला तर चंदनापेक्षा तब्बल 100 पट जास्त महाग लाकूड असून त्याची किंमत पहिली तर विश्वास बसणार नाही अशी आहे.
आफ्रिकन ब्लॅक वूड आहे चंदनापेक्षा महाग लाकूड
जगातील लाकडाचा विचार केला तर चंदनापेक्षा 100 पट जास्त किंमत असलेले लाकडू म्हणजे आफ्रिकन ब्लॅक वूड हे होय. जर आपण या लाकडाच्या किमतीची चंदनाच्या लाकडाच्या किमतीशी तुलना केली तर तब्बल 100 पटीने फरक पडतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर चंदनाचे लाकूड प्रति किलो सात ते आठ हजार रुपये दराने विकले जाते. तर आफ्रिकन ब्लॅक वूड हे प्रति किलो सात ते आठ लाख रुपये प्रतिकिलो किमतीने विकले जाते. यावरून आपण अंदाज बांधू शकतात की हे लाकूड किती मौल्यवान आहे ते.
जगातील 26 देशांमध्ये आढळते आफ्रिकन ब्लॅक वूड
जगातील 26 देशांमध्ये आफ्रिकन ब्लॅक वूडचे झाड आढळून येते. जर आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर साधारणपणे आफ्रिकी महाद्वीपच्या मध्य आणि दक्षिण भागांमध्ये ही झाडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. साधारणपणे 25 ते 40 फुटाचे हे झाड असते व त्याला पूर्ण वाढ होण्याकरिता साठ वर्षाचा कालावधी लागतो. जर आपण या झाडाच्या लाकडाच्या या अफाट किमतीचा विचार केला तर या मागील प्रमुख कारण म्हणजे सध्या ही झाडे दुर्मिळ होत चालली असून त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होत आहे.
कोणत्या कामासाठी केला जातो आफ्रिकन ब्लॅक वूडचा वापर?
शहनाई, बासरी आणि संगीत क्षेत्रातील अनेक वाद्य तयार करण्यासाठी या आफ्रिकन ब्लॅक वूडचा वापर केला जातो. तसेच फर्निचर बनवण्याकरिता देखील याचा वापर होतो. आफ्रिकन ब्लॅकवूड पासून बनवलेले फर्निचर हे अतिशय महाग असते व त्यामुळे श्रीमंत माणसांच्या घरांमध्येच या लाकडापासून बनवलेल्या वस्तू जास्त प्रमाणात दिसून येतात. तसेच या लाकडाच्या तस्करीचा विचार केला तर या दृष्टिकोनातून तस्करीचे प्रमाण खूप वाढले असल्यामुळे या झाडांचे संख्या कमी होत आहे त्यामुळे काही देशांमध्ये या झाडांच्या सिक्युरिटी करिता शस्त्रधारी सैनिक देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.