Old Pension Movement : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, रेल्वे युनियन, केंद्रीय कर्मचारी संघटनेसह इतर कर्मचारी संघटनांनी १० ऑगस्ट रोजी रामलिला मैदानावर आंदोलन केले. सरकारने पेन्शन लागू करण्याची मागणी मान्य न केल्यास भारत बंदसह बेमुदत संप पुकारण्याचा इशारा केंद्र सरकारला आंदोलकांनी दिल्याची माहिती राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी दिली.
राष्ट्रीय पेन्शन आंदोलनाचे निमंत्रक शिव गोपाल मिश्रा, सहसंयोजक डॉ. एम. राघवैय्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव कमलाकांत त्रिपाठी, वरिष्ठ उपाध्यक्ष रामचंद्र दबास देविदास बस्वदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
जुनी पेन्शन पूर्ववत न केल्यास रेल्वे चक्का जाम व भारत बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा रेल्वे कर्मचारी युनियन ने केंद्र सरकारला दिला.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव कमलाकांत त्रिपाठी म्हणाले की, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून आम्ही तो मिळवणारच पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला.
सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले. या आंदोलनासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, विदर्भ विभागप्रमुख किरण पाटील, जिल्हा सचिव सुनील शिंदे, नारायण पेरके, संजय मानकरी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची पेन्शन संघर्ष यात्रा लवांडे ५ सप्टेंबर शिक्षक दिनी ते ५ ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन या कालावधीत भारताच्या चार सीमेवरुन पेन्शन संघर्ष यात्रा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ काढणार आहे. महाराष्ट्रातून यातील दोन यात्रा जात आहेत. त्याद्वारे जाणीव जागृती व आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. पेन्शन मिळेपर्यंत निरंतर आंदोलन करण्यात येईल.