Ahmednagar News : बनावट दारू विक्री करणाऱ्याला जेरबंद करण्यात उत्पादन शुल्कच्या येथील भरारी पथकाला यश आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव जालिंदर गोरक्षनाथ चितळकर, असे असून या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने ४९ हजाराची विदेशी दारू जप्त केली आहे.
याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कारवाई केली आहे, पैकी मुख्य सुत्रधार फरार झालेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ११ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, वावी – राहाता रोड, येसगाव शिवार (ता. कोपरगाव) या ठिकाणी हॉटेल जय मल्हार मध्ये बनावट देशी दारूची विक्री केली जात आहे.
यावेळी दारुबंदी गुन्ह्याखाली पोलिसांनी छापा ठाकला असता, आरोपी जालिंदर गोरक्षनाथ चितळकर (रा. येसगाव, ता. कोपरगाव) या इसमाकडे अवैद्य देशी व विदेशी मद्य मिळून आले. मिळुन आलेल्या देशी दारू १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्या बनावट असल्याचे आढळुन आले आहे.
विदेशी दारूचे १.५ बॉक्स व देशी दारु भिंगरी संत्राच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ४ बॉक्स तसेच एक मोबाईल, असे एकुण ४९ हजार २२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर बनावट देशी मद्याबाबत तपास केला असता, भाऊसाहेब जगताप याच्याकडुन प्राप्त झाले, असे समजले, अटक आरोपी व फरार आरोपी भाऊसाहेब जगताप याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
न्यायालयाने आरोपीला (दि. २५) ऑगस्ट २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विक्री करणारा मुख्य सुत्रधार भाऊसाहेब जगताप हा फरार आहे. त्याचा शोध राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग व भरारी पथक श्रीरामपूरद्वारे घेण्यात येत आहेत.