सोलापूर, दि. ८ : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत २९ रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे.
यामध्ये नव्वद वर्षाचे आजोबा तर एक वर्षाचे बाळही असल्याची माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे.
डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलीगीकरण कक्षात एकूण १०३ रुग्ण भरती झाले होते. त्यातील २९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या २९ जणांत एक रुग्ण तब्बल ९० वर्षाचे होते तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते.
मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे. एका रुग्णास न्युमोनिया होता, तसेच मूत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोव्हिड आयसीयूमध्येच डायलिसिस करण्यात आले. त्याचा न्यूमोनियाही बरा झाला.
उर्वरित २६ रुग्णांपैकी सात लोकांना न्युमोनिया होता. पाच लोकांना घसादुखीचा त्रास होता. उर्वरित १४ लोकांना कोरोना बाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती.
मात्र यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि ह्दयविकार आदी त्रास होते. मात्र त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले.
विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या २६ रुग्णांना न्यूमोनिया, २८ रुग्णांना घसादुखीचा त्रास होता. म्हणून खोकला, ताप अथवा दम लागल्यास रुग्णालयात तत्काळ येणे गरजेचे आहे.
मृत झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश ५५ वर्षापेक्षा जास्त आहेत. म्हणून ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.