महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. सणासुदीत महागाईतून दिलासा मिळणार का अशी अपेक्षा सर्वसामान्य करीत आहे. मात्र अशातच बाजारात तांदूळ किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यंदा बेळगाव, घोटी (नाशिक) येथून येणाऱ्या तांदळाचे भाव वाढले असल्याने बाजारात तांदळाला ५ हजारांवर दर आहे. दसऱ्यानंतर नवीन तांदूळ बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे. त्यात यंदा शेतकऱ्यांकडे तांदूळ शिल्लक नसल्याने तांदळाचे दर आणखी वाढणार आहेत. मात्र, भात लावणीसाठी मजुरीचे दर वाढले. त्या तुलनेत तांदळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये “कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे.
मावळ तालुका हा तांदळाचे आगार आहे. या तालुक्यात इंद्रायणी आणि आंबेमोहोर या वाणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कामशेत बाजारपेठेत तांदळाला चांगला भाव मिळत आहे. ‘इंद्रायणी’ला ५५०० ते ६००० रुपये क्विंटल, आंबेमोहोर ६५०० ते ७००० पर्यंत आणि साईराम (जिरा कोलम) ४५०० ते ५५०० रुपये क्विंटल या दराने विकला जात आहे.
हंगामात इंद्रायणी चा दर कमी होता. हंगाम संपताच दर वाढले. बेळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून येणाऱ्या तांदळाचे दर वाढल्याने मावळमधील बाजारपेठेतही तांदळाची दरवाढ झाली. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळेही दरवाढ झाली.
भात लावणीसाठी महिलांना गेल्या वर्षी २५० ते ३०० रुपये मजुरी द्यावी लागत होती. यावर्षी मजुरी ४०० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे तांदळाचे दर वाढले असले तरी ते कमीच आहेत. या दरवाढीने शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झालेला नाही.
यावर्षी भात लावणीसाठी मजुरीचे दर वाढले. आहेत. त्याचा परिणाम तांदळाच्या दरावर झाला. आणखी दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.