आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Ahmednagarlive24
Published:

 जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8- भुसावळ शहरातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील

यांनी आज सांयकाळी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठीण काळात सर्व अधिकारी व यंत्रणामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले.

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून रुग्णांबाबतचा आढावा घेतला.

याप्रसंगी जामनेर रोड बंद करण्यात आल्याने व याच भागात 75 टक्के दवाखाने असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने सुरू ठेवण्याची सूचना केली

तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासनाच्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे,

शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment