Ahmednagar News : मतदार संघातील ब्राम्हणगाव सबस्टेशनसाठी ३ कोटी रुपये निधी दिला आहे. येत्या काही दिवसात ब्राम्हणगाव सबस्टेशनचे काम पूर्ण होवून ब्राम्हणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे यांनी म्हटले आहे की, ३ कोटी निधीतून सुरू असलेल्या ब्राह्मणगाव सबस्टेशनच्या ११ किमी ३३ के. व्ही. लाईन टाकणे, ५ एम. व्ही. ए. ट्रान्सफॉर्मर बसवणे आदी कामांची व तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये निधीतून सुरु असलेल्या श्री जगदंबा माता मंदिराच्या कामाची पाहणी केली.
तसेच ब्राह्मणगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या आहेर वस्ती ते बदापुर रस्ता खडीकरण कामाचे व ७ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. काळे यांनी केले.
अजूनही काही रस्त्यांचा विकास होणे बाकी असून या रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्वच रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत.
यावेळी राजभवनात जनसंपर्क अधिकारी सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल सीताराम पवार व पोलीस दलात निवड झाल्याबद्दल किरण माळी यांचा आ. काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.